अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष व माकपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कॉ. जयसिंग माळी रा. मोड ता तळोदा यांच्या निधनानंतर दि २७ मार्च रोजी दुपारी बारा वाजता त्यांचा कार्याशी जुळलेला समुदाय व पुरोगामी विविध पक्ष संघटनांच्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेत ते आपल्यात शरीराने नसले तरी विचार व कार्याने सतत स्मरणात राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पंधरा दिवसांपूर्वी चळवळीचे ज्येष्ठ नेते कॉ.जयसिंग माळी यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर शोक सभेचे आयोजन कॉम्रेड बी.टी.आर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. या शोक सभास्थळी माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार ॲड.के.सी. पाडवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, आदिवासी एकता परिषदेचे ज्येष्ठ नेते कॉ. वहारू सोनवणे, शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. सुनील गायकवाड, माकपाचे जिल्हा सचिव कॉ. नथू साळवे, प्रतिभाताई शिंदे, माकपाचे प्रदेश सचिव कॉ.डी.एल. कराड, कॉ. सुनील मालसुरे ,कॉ किसन गुजर, बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शोक सभेच्या प्रारंभी स्वर्गीय काँ. जयसिंग माळी यांच्या प्रतिमेला उपस्थितांच्या पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी मंत्री के.सी. पाडवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक वहारू सोनवणे कॉम्रेड डी.एल. कराड सह अन्य नेत्यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून स्वर्गीय कॉम्रेड जयसिंग माळी यांच्या परिवाराचे सांतवन केले. शोक सभेचे प्रास्ताविक कॉ. नथू साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन कॉ. सुनील गायकवाड यांनी केले.