शहादा, शहर व नवापुर पोलीस ठाणे यांचे पथकांची जिल्हयाभरातुन उत्कृष्ट कामगिरी..
मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या क्राईम कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील हरवलेल्या महिला व बालकांसंबंधी विषयात गांभीर्याने लक्ष घालुन त्याबाबत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, अशा पोलीस विभागास स्पष्ट सुचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडुन राज्यातील प्रत्येक जिल्हयात दि. १९/४/२०२५ ते १५/५/२०२५ दरम्यान विशेष मोहिम राबविणे संदर्भातील परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते.
त्याअनुषंगाने जिल्हाभरातील हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाणे तसेच उपविभागीय कार्यालयांचे पथक तयार करुन हरवलेल्या एकुण ९८ महिला व बालकांचा शोध घेण्यात आला असुन त्यामध्ये ८३ महिला व १५ बालके यांचा शोध घेण्यात पोलीस विभागास यश मिळाले आहे. यामध्ये विशेषतः शहादा, शहर तसेच नवापुर पोलीस ठाणे यांनी चांगली कामगिरी करुन महिला व बालकांचा शोध घेतला असुन या मोहिमेमध्ये पोउपनि-भाऊसाहेब लांडगे (नवापुर पो. ठाणे), असई/भगवान धात्रक (नियंत्रण कक्ष), असई/प्रदिपसिंग राजपुत (शहादा पोलीस ठाणे), पोहेकॉ योगेश लोंढे, मपोकॉ/वर्षा पानपाटील (म्हसावद पो. ठाणे) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
"तरी यापुढे देखील महिला व बालकांचे संदर्भात विशेष पथकांद्वारे शोध मोहिम सुरु राहणार असुन जिल्हयातील नागरिकांना हरविलेल्या व्यक्तींबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्षाला माहिती कळवावी, असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी केले आहे."