अक्कलकुवा (प्रतिनिधी –रुपसिंग वसावे) अक्कलकुवा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या हजारो घरकुल लाभार्थ्यांना विटांच्या प्रचंड दरवाढीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस अक्कलकुवा च्या वतीने तहसीलदार विनायक घुमरे यांना निवेदन सादर करून विटांच्या अनधिकृत दरवाढीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात सुमारे वीस हजारांहून अधिक घरकुल मंजूर असून, काही विट भट्टी मालक योजनेचा फायदा घेऊन दरवाढ करत आहेत. पूर्वी ५,००० ते ६,००० रुपये प्रति हजार इतका दर असलेली वीट सध्या ८,००० ते ९,००० रुपये दराने विकली जात आहे. यामुळे घरकुल बांधकाम थांबले असून, लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे प्रशासनाकडे विटांचे दर नियंत्रित करण्यासाठी धोरण ठरवावे, दरनिश्चितीसाठी यंत्रणा उभारावी व गरजू लाभार्थ्यांचे शोषण थांबवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. यासोबतच भट्टी मालकांवर योग्य ती कारवाई करण्याचेही आवाहन करण्यात आले.निवेदन सादर करताना
सागर वळवी (तालुकाध्यक्ष),मानसिंग वसावे (उपाध्यक्ष),विकास पाडवी, किसन वसावे,मानसिंग नाईक, रामसिंग वसावे,रमेश पाडवी, नरेश वसावे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.