नंदुरबार दि १९ (प्रतिनिधी) मानवी आयुष्यात सुखदुःखांच्या प्रसंगांना कॅमेरात कैद करून भूतकाळातील आठवणींचे प्रतिबिंब म्हणजे छायाचित्र. सेवा आणि व्यवसायाचा समन्वय असलेल्या छायाचित्र क्षेत्राला समाजात मानाचे स्थान आहे. दीडशे वर्षांपूर्वीची फोटोग्राफी आणि आज बदलते तंत्रज्ञानात विकसित झालेली डिजिटल फोटोग्राफी प्रभावी माध्यम ठरले आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या बातमीत छाया चित्रा शिवाय बातमी अपूर्ण ठरते. असे प्रतिपादन भागवताचार्य वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले.
येथील दंडपाणेश्वर मंदिर सभागृहात नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन आणि नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून भागवताचार्य वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले. संघटनेतर्फे अविनाश जोशी महाराजांच्या यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पुढे बोलताना जोशी म्हणाले की, कुटुंबाच्या प्रगती आणि चरितार्थासाठी छायाचित्रण व्यवसाय करताना अनंत अडचणी येतात.
प्रास्ताविक करताना प्रेस फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सांगितले की, सुमारे 185 वर्षांपूर्वी छायाचित्रणाला सुरुवात झाली. फोटोग्राफी क्षेत्राला अध्यात्म आणि कलेची जोड देण्याची गरज आहे असे सांगून फोटोग्राफी क्षेत्रातील ऐतिहासिक माहिती
कथन केली.
जागतिक फोटोग्राफी दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महादू हिरणवाळे यांनी मानले. या स्नेह मेळावा कार्यक्रमास माजी अध्यक्ष राकेश तांबोळी, प्रफुल निकुंभे,नितीन पाटील , सूर्यकांत खैरनार, महादू हिरणवाळे, कपिल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी केले.