कोलवीमाळ दि १९ (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील
दहिवद (ता. शिरपूर) येथील केवळ सहा वर्षीय निष्पाप आदिवासी बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटना, नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात आरोपी सुनील किरोभा काळे याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा तसेच सरकारने विशेष लक्ष घालून पीडित बालिकेला तात्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, "एका बाजूला संपूर्ण देश 79 वा स्वातंत्र्य दिन अभिमानाने व आनंदाने साजरा करत असताना, दुसऱ्या बाजूला दहिवद येथे केवळ सहा वर्षीय बालिकेवर नराधमाने केलेला अत्याचार ही घटना मानवतेलाही हादरवून टाकणारी आहे. समाजाच्या अंत:करणाला चटका लावणारी ही घटना केवळ कुटुंबापुरती मर्यादित नसून संपूर्ण आदिवासी समाजासाठी अत्यंत वेदनादायी आहे."
या घटनेत आरोपीवर तात्काळ आणि कठोर कारवाई करून समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने ठासून सांगितले आहे. यासोबतच जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्यामार्फत हे निवेदन जिल्हाधिकारी, धुळे तसेच पोलिस अधीक्षक, धुळे यांना पाठविण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.
निवेदनावर ॲड. रोहन गिरासे, ॲड. विजय नाईक, ॲड. दावीद वळवी, ॲड. प्रदीप वळवी, ॲड. संजय वसावे, ॲड. आकाश वळवी, ॲड. महेश वळवी, ॲड. मगन गावित यांसह अनेक वकिलांच्या सह्या आहेत.